जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२६
नशिराबाद येथील मणियार मोहल्ल्यात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका व्यक्तीवर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दि. २५ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख खलील अहमद सलीम मणियार (वय ३७, रा. मणियार मोहल्ला वाडा, नशिराबाद, ता. जळगाव) हे मणियार मोहल्ला परिसरात वास्तव्यास आहेत. दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून शेख ओसामा शेख रहेमतुल्ला यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. हा वाद वाढत जाऊन हाणामारीत रूपांतरित झाला.
यावेळी शेख ओसामा यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी शेख खलील यांना शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आल्याने शेख खलील हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारानंतर शेख खलील यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत विरणारे करीत आहेत.




















