
जळगाव मिरर | १३ मे २०२४
लग्नाचा पहिला वाढदिवस असताना व तसे मोबाईलमधील व्हाट्सअपवर स्टेट्स ठेऊन सकाळी आनंदात दिसणाऱ्या तरुणाने दुपारी साडेबारा वाजता अचानक गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. १२ मे रोजी उघडकीस आली आहे. यामुळे कुटुंबियांवर मोठा आघात कोसळला असून जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, कुणाल प्रकाश सूर्यवंशी (वय २९, रा. दातर्ती ता. साक्री जि. धुळे ह. मु. स्वामी समर्थ कॉलनी, द्वारका नगर परिसर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो स्वामी समर्थ कॉलनी येथे आई, वडील, पत्नी आणि तीन महिन्याच्या मुलीसह राहत होता. त्याचे शिक्षण सिव्हिल इंजिनिअर झाले असून एका सिमेंटच्या कंपनीत तो मार्केटिंग करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. रविवारी दि. १२ मे रोजी त्याच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झाली, म्हणून त्याने मोबाईलमध्ये व्हाट्सअपवर स्टेट्स ठेवले होते. सकाळी कुटुंबियांसह अनेकांना तो भेटला तेव्हा आनंदी दिसत होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
दुपारी घरी असताना साडेबारा वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरी अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, कुटुंबियांना समजताच त्यांना जबर धक्का बसला. तातडीने पोलिसांच्या मदतीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि अहिरे, पोहेकॉ अनिल फेगडे यांनी पंचनामा करून पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी हळहळ व्यक्त होत आहे.