जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२३
जळगाव जिल्हा दौऱ्यावर दि.१७ रोजी आमदार बच्चू कडू आले होते. यावेळी दिव्यांग विभागाचा कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी भाषणात बच्चू कडू यांनी त्यांचं मत मांडत भूमिका स्पष्ट केली.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी ‘खोके खोके’ टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आमची बदनामी केली जात आहे. मला बदनामीची पर्वा नाही. आम्ही गुवाहाटीला नसतो गेलो, तर आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं नसतं, अशा शब्दात टीकाकार विरोधकांना बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बच्चू कडू म्हणाले, ‘गुवाहाटीला गेलो म्हणून इतके बदनाम झालो की, लोक बाहेर पडले की खोके घेतले म्हणून बोलतात. जिकडे गेलो तिकडे खोके घेऊन आला, खोके घेऊन आलास असं आम्हाला म्हणतात. आमची बदनामी करण्यात येते. मला त्याची परवा नाही. गुवाहाटीला गेल्यामुळे दिव्यांग मंत्रालय मिळालं’.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा घटनाक्रम देखील बच्चू कडू यांनी सांगितलं. बच्चू कडू म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन वर्ष राहिलो. मात्र, दिव्यांग मंत्रालय झालं नाही. मी एकनाथ शिंदे यांना अट घातली होती. जर तु्म्ही मला दिव्यांग मंत्रालय देत असाल तरच मी तुमच्यासोबत येतो, नाहीतर गाडीतून उतरतो. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. आज दिव्यांग मंत्रालय मिळालं आहे’. ‘दुसऱ्या वेळी जेव्हा गुवाहाटीला गेलो, त्यावेळी मी एकनाथ शिंदे यांना दिव्यांग मंत्रालयाबाबत आठवण करून दिली होती. त्यानंतर ते दिव्यांग मंत्रालय आपल्याला मिळालं असेही यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं.