जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२४
देशातील लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाल्याने राज्यात देखील राजकीय वातावरण तापले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नरेंद्र मोदी चोर असून अशा चोरांना मतदान करु नका, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. मोदी केवळ काँग्रेसलाच नव्हे, तर स्वतः च्या भाजपा पक्षाला देखील संपवायला निघाले आहेत, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर हे शुक्रवारी ता. १२ भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वंचितचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय केवट यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेतून प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली.
नरेंद्र मोदी सुरुवातीपासून काँग्रेसला संपवण्याची भाषा बोलत होते. मात्र नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला नाही तर स्वतः च्या भाजपा पक्षाला संपवलेला आहे. आज भाजपापेक्षा मोदी मोठे झालेले आहेत. खुद्द देवेंद्र फडणवीस त्यांच्या भाषणातून भाजपाला मजबूत करण्यासाठी मत मागत नाही तर मोदींना मजबूत करण्यासाठी मत मागताना दिसत आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
भाजपने गुंड प्रवृत्तीने लोकांना धमक्या देऊन निवडणूक रोख्यांमधून कोट्यवधी रुपये कमावले, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. जिल्ह्यात धंदेवाल्यांकडून धमक्या देऊन वसुली करणारे गुंड असतात. आपण अशा गुंडांना मतदान करून निवडून आणत नाहीत, तर मग निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून अब्जावधी रुपये कमावणाऱ्या चोरांना कसे मतदान करणार, असा सवाल देखील आंबेडकर यांनी विचारला.
प्रकाश आंबेडकर यांनी मोदींच्या गॅरंटीची देखील चांगलीच पोलखोल केली. भारत हा हिंदुत्ववादी राष्ट्र बनवू असे सांगणाऱ्या मोदींच्या १० वर्षाच्या कार्यकाळात तब्बल १७ लाख कुटुंबांनी भारताची नागरिकता सोडून पलायन केलेले आहे. जर पुढचे ५ वर्ष अजून यांच्या हातात सत्ता दिली, तर २० लाखांहून अधिक कुटुंब देश सोडून जातील, असा टोला आंबेडकर यांनी मोदींना लगावला. जर तुम्ही भाजपालाच मतदान करत असाल, तर हा देश राम भरोसे आहे. त्यामुळे मतदारांनो जागे व्हा जागृत व्हा सतर्क व्हा. एवढी माहिती दिल्यानंतरही जर तुम्ही भाजपालाच मतदान करत असाल, तर हा देश राम भरोसे आहे असेच म्हणावे लागेल, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.