जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२५
गेल्या पाच वर्षापूर्वी भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा भारतात सुरू करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही युजर्सनी टिकटॉकच्या वेबसाइटचे होमपेज उघडत असल्याचा दावा केला आहे. यामुळे टिकटॉक भारतात पुन्हा परत येऊ शकते का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन आणि जपानच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यापूर्वीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक सुरू होणार का? असा सवाल केला जात आहे. यावर केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, टिकटॉकवरील बंदी उठवण्याचा कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही.
दरम्यान, या चर्चानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेस पक्षाने ट्वीट करत लिहिले की, ‘भारतात चीनची कंपनी ‘टिकटॉक’ ची वेबसाइट पुन्हा सुरू झाली आहे. चीनबरोबरच्या संघर्षात आपले 20 शूर जवान शहीद झाले. प्रथम नरेंद्र मोदी यांनी चीनला क्लीन चिट दिली. पण जेव्हा काँग्रेसने दबाव टाकला, तेव्हा हेडलाइन्स मॅनेज करण्यासाठी ‘टिकटॉक’ वर बंदी घालण्यात आली.’
पुढे काँग्रेसने म्हंटले की, ‘आता मोदी पुन्हा चीनशी जवळीक साधत आहेत. त्यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली आणि स्वतः चीनला जाणार आहेत. याच दरम्यान टिकटॉकशी संबंधित ही बातमी समोर आली. यावरून स्पष्ट होते की, नरेंद्र मोदी यांचे चीन प्रेम देशप्रेमावर भारी पडले आहे. पाकिस्तानबरोबरच्या सीजफायरप्रमाणे चीनबरोबरही सौदा केला आहे.’
भारत सरकारने चीनचे शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकवरील बंदी हटवलेली नाही. बंदी हटवण्यासाठी कोणताही आदेश दिला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. ANIने सरकारी सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉकवरील बंद हटवण्यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही. टिकटॉक, AliExpress आणि Shein या सारखे ॲप अनब्लॉक केल्याची वृत्त समोर येत होती. त्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.