जळगाव मिरर । ११ डिसेंबर २०२२
देशाचे पंतप्रधान मोदी आज राज्यातील नागपूर येथे मेट्रोच्या फेज वनचं लोकार्पण केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वतः मेट्रोचे तिकीट खरेदी करत नागपूर मेट्रोने प्रवास केला. पंतप्रधान मोदी नागपूर मेट्रोच्या झिरो माइल्स स्टेशनवर पोहोचले. तेथे त्यांनी फ्रिडम पार्कची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी झिरो माइल्स ते खापरी असा मेट्रो प्रवास केला. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः तिकीट खरेदी केले. या प्रवासात त्यांनी विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि इतर नागरिकांशी चर्चा केली. मेट्रोने खापरीला पोहोचल्यानंतर ते समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉइंटवर पोहोचले.
आज सकाळी पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा सुरु झाला. पंतप्रधानांचं नागपूर विमानतळावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत केले. नागपूर विमानतळावरून मोदी सर्वप्रथम नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेथे त्यांनी नागपूर ते बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
समृद्धी महामार्गाचा एंट्री पॉइंट शिवमडका, वायफळ टोलनाका येथून त्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. तेथून त्यांनी समृद्धी महामार्गावरून 10 किलोमीटरचा प्रवास केला. हा महामार्ग नागपूर विदर्भासह महाराष्ट्रासाठी वरदान ठरणार आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा महामार्ग साकारण्यात आलेला आहे. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर महाराष्ट्रासाठी एक इतिहास रचला गेला असल्याचा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्गाने नागपूर ते मुंबई हे 701 किलोमीटर अंतर केवळ 8 तासांत पूर्ण करता येणार आहे. यातील 520 किमीचा नागपूर ते शिर्डी मार्ग पूर्णपणे तयार झालेला आहे. त्यापुढील मार्गाचे कामही वेगाने सुरू आहे. या मार्गाचा मोठा फायदा महाराष्ट्राला होणार आहे. विविध विकासकामांचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान एम्स रुग्णालय परिसरातील मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचले. पंतप्रधानांनी नागपूर एम्स रुग्णालयाचं लोकार्पण केलं. या रुग्णालयाच्या कामाची पायाभरणी पंतप्रधानांच्याच हस्ते 2017 साली करण्यात आली होती.