मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईत 26/11 रोजी झालेला दहशतवादी हल्ला महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांनी आपले जीव गमावले होते. त्या हल्ल्यात देशाच्या जवानासोबत पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. 26/11 सारखाच हल्ला पुन्हा करण्याची धमकी पाकिस्तानमधून देण्यात आली आहे. 26/11 सराखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मुंबई ट्राफिक पोलिसांना देण्यात आली आहे.
ट्राफिक पोलिसांच्या कंट्रोल रुममधील व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये ६ दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा केला गेला आहे. तसंच लवकरच मुंबईत २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी यात दिली गेली आहे. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे.
काय लिहिलं मेसेजमध्ये आहे :
अभिनंदन मुंबईमध्ये हल्ला होणार आहे. मुंबईमध्ये हल्ला करण्याची तयारी करत आहे. मी पाकिस्तानमधून आहे. तुमचे काही भारतीय मुंबईला उडवण्यात माझी साथ देत आहेत. मुंबईला उडवण्याची पूर्ण तयारी झाली आहे, आता काहीच वेळ शिल्लक आहे. कधीही हल्ला करू शकतो. 26/11 चा हल्ला लक्षात असेलच. नसेल तर आता पुन्हा एकदा पाहा. ही फक्त धमकी नाही, तर प्रत्यक्षात येतोय. माझं लोकेशन पाकिस्तानमध्ये दिसेल पण काम मुंबईत चालेल. आमचा काही ठिकाणा नसतो. लोकेशन तुम्हाला दुसऱ्याच देशाचं दसेल.
