जळगाव मिरर | २१ एप्रिल २०२४
जिनिंगमध्ये काम करणाऱ्या सुरेश परमसिंग सोलंकी (वय २५, रा. खेमला, जि. सेंधवा, मध्यप्रदेश, ह. मु. आव्हाणे शिवार) या कामगाराच्या डोक्यात कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करीत त्याचा निर्धन खून केला. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगच्या मागील शेतात घडली. याप्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु असून हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारात लक्ष्मण पाटील यांच्या मालकीची लक्ष्मी जिनिंग असून त्यांच्याकडे मध्यप्रदेशातून काही तरुण आले आहे. जिनिंगमध्ये काम केल्यानंतर हे मजूर त्याच ठिकाणी बांधलेल्या खोल्यांमध्ये वास्तव्यास असतात. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे सुरेश सोलंकी हा मजूर गेल्या चार ते पाच महिन्यांपुर्वी जिनिंगमध्ये कामाला आलेला होता. याठिकाणी मजूरी काम करुन तो स्वतःचा उदनिर्वाह करीत होता. शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सुरेश सोलंकी याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जिनिंगच्या मागील बाजूस असलेल्या भरत खडके यांच्या शेतात कुट्टीवर झाकलेल्या ताडपत्रीवर आढळून आला. दरम्यान, मयताच्या डोक्याला मागील बाजूला कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार केल्याची जखम होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजून गेली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. जिनिंग कंपनीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून तपासणी केली जात होती.