जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२३
राज्यातील अनेक शहरात पावसाचा जोर वाढत आहे. तर नागपुरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. मोर भवन परिसरात पाणीच पाणी जमा झाले. बस स्थानकावरील बस पाण्यात बुडाल्या. एका रात्रीत 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून नागपूर शहर पूर्णपणे पावसाच्या पाण्यात तुंबले आहे.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत 140 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मुक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. नागपूर शहराच्या विविध भागात 2 एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे. अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या बोलावल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपूरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखोल भागात पाणी शिरले असून नागलवाडी, अंबाझरी कार्पोरेशन कॉलोनी मधील अनेक घरात पाणी शिरले आहे. हवामान विभागाने नागपुरात आधीच ऑरेंज अलर्ट दिला होता. वास्तविक येथे अद्यापही पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.