जळगाव मिरर / १६ ऑक्टोबर २०२२
राज्यात सुरु असलेले राजकीय समीकरण बघता कोण कोणत्या गटात जाईल आणि कोण कोणत्या पक्षाची साथ घेईल हे मात्र गेल्या चार महिन्यापासून कुणीही सांगू शकत नाही. त्यातच आता अजित पवार यांनी शिंदे गटावर टीका केल्यानंतर शिंदे गटाकडून प्रत्युत्तर येणार नाही असे होईल का ? या पवारांच्या टीकेला शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी चांगलेच बोल सुनावले आहे.
राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांनी राष्ट्रवादीतील आमदारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी एका वृत्त वाहिनीवर सांगितलं की, “राष्ट्रवादीचे अनेक आमदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे. अजित पवार आपल्या आमदारांना थोपवण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात. त्यांना पण माहित आहे की, आमचं बहुमत कमी होणार नाही, उलट वाढत जाणार आहे” देसाईंच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधान आलं. आमचं १७० चं बहुमत आहे, ते १८०-१८५ होईल हे सुध्दा अजित पवारांना माहित आहे. अजित पवारांच्या आशा वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही असं देसाई म्हणाले आहेत.
काय केली होती अजित पवारांनी टीका
जोपर्यंत आमदारांचं संख्याबळ १४५ आहे, तोपर्यंत सरकार चालणारच. मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे कळेल. ज्या आमदारांना सोबत घेतलं, त्यांना दिलेल्या आश्वासनाबाबत आता अस्वस्थता सुरू झाली आहे. त्यामुळे थोडं थांबायला हवं. योग्य वेळ येण्याची वाट पाहतोय. दरम्यान महाराष्ट्रात जे सुरू आहे ते लोकशाहीला घातक आहे. अशा पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण झालं तर स्थिरता राहणार नाही. अशा प्रकारचे पायंडे महाराष्ट्राला आणि देशालाही परवडणार नाही. हे सर्व शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. शिवाय शिवसैनिकांनाही हे आवडलेलं नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता शिवसेनेला बंडाचा मोठा फटका बसला आहे, त्याच्यानंतर आता राष्ट्रवादीला देखील बसणार का पाहवं लागेल.
