जळगाव : प्रतिनिधी
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने मागील २० वर्षे अविरतपणे कार्यरत असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी अर्थात् घटस्थापनेच्या दिनी २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या द्विदशक-पूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्यावतीने व्यापकस्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण भारतभर ३१ ऑगस्टपासून अर्थात गणेश चतुर्थीपासून चालू झालेले हे अभियान नोव्हेंबर महिन्यापर्यंत राबवले जाईल, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक यांनी जळगाव येथील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रथितयश अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी, हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. मोहन तिवारी आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस हे उपस्थित होते. ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’त ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘हिंदु धर्माची महानता’, ‘शौर्य जागरणाची आवश्यकता’, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’ इत्यादी विषयांवरील व्याख्याने, हिंदु राष्ट्र जागृती करणारी फलकप्रसिद्धी करणे, मंदिरे, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, महिला संघटनाचे उपक्रम, स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
याशिवाय येत्या रविवारी, २ ऑक्टोबर या दिवशी जळगाव शहरात ला. ना, शाळेतील गंधे सभागृह येथे सायंकाळी ५ वाजता हिंदु संघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हिंदु राष्ट्र परिसंवाद’, हिंदुत्वनिष्ठ संघटना, अधिवक्ता यांच्या बैठकाही आदी उपक्रम देशभरात राबवले जाणार आहेत. ७ ऑक्टोबरला चोपडा येथे तर १६ ऑक्टोबरला फैजपूर येथे हिंदू संघटन मेळाव्याचे आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे,” असे प्रशांत जुवेकर म्हणाले.