जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२५
लातूर येथे ५ ते ७ डिसेंबरदरम्यान झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष व महिला अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू निकिता दिलीप पवार हिने सुवर्णपदकाची कमाई करत राज्यभरात जळगावचा झेंडा उंच फडकावला. महिलांच्या ५७ किलो वजन गटात दमदार खेळी सादर करून तिने सलग तिसऱ्यांदा राज्य सुवर्णपदक पटकावण्याची उल्लेखनीय कामगिरी केली.स्पर्धेत सर्वात्कृष्ट खेळाडू म्हणून बेस्ट फायटर पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले.
निकिताने पहिल्या फेरीत ठाण्याच्या, दुसऱ्या फेरीत कोल्हापूरच्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. अंतिम सामन्यात पुण्याची खेळाडू श्रद्धा वाल्हेकर हिला पराभूत करत तिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या विजयामुळे आगामी हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातील तिचे स्थान निश्चित झाले आहे.
राष्ट्रीय स्तरावर तिने यापूर्वी एक सुवर्ण व एक कांस्यपदक पटकाविले असून तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीची पुन्हा एकदा दाद मिळाली आहे. निकिताला प्रशिक्षक जयेश बाविस्कर आणि अजित घारगे यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.




















