पटना : वृत्तसंस्था
नितीश कुमार यांनी भाजपला सत्तेच्या खुचीतून खाली खेचत लालू प्रसाद यांच्यासोबत आघाडी करून पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. नितीशकुमार यांच्यासोबत आज तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
नितीशकुमार आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. नितीश कुमार यांनी महाआघाडीचे नेते म्हणून बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना शपथ दिली. यासोबतच तेजस्वी यादव यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाचीही शपथ घेतली आहे. तेजस्वी यादव दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना मिठी मारून आशीर्वाद दिला. नितीश कुमार म्हणाले की, निवडणुकीपासून भाजप आपल्याशी काय वागत आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या दोन महिन्यांपासून परिस्थिती बिकट झाली होती. तसेच भाजपनं जेडीयू कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत नितीश कुमार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडून सत्ता मिळवणाऱ्या भाजपला बिहारमधली सत्ता मात्र गमवावी लागली आहे. दरम्यान, शपथविधी सोहळ्यासाठी लालू प्रसाद यादव यांचं संपूर्ण कुटुंब राजभवनात उपस्थित होतं. त्यात राबडी देवी, तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्या पत्नी राहेल यादव यांचा समावेश आहे.