जळगाव मिरर । १३ जानेवारी २०२३ ।
राज्याचे मुख्यमंत्री दोन दिवसाआधी जळगाव जिल्हा दौरा केला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गुवाहातीचा प्रवास कसा झाला हे सर्व गुपित उघडल्यानंतर ना.गिरीश महाजन यांनीही यावेळी मोठा गोप्यस्फोट केला होता. यानंतर आता शिंदे गटाच्या एका आमदाराने ना.महाजन यांनी केलेले विधान खोडून काढले आहे.
शिवसेना फोडण्यामागे नेमका कुणाचा हात आहे? पक्ष प्रमुखांचं दुर्लक्ष भोवलं की अंतर्गत बंडाळी वाढली? ठाकरेंभोवतीची चौकडी यासाठी कारण ठरली का सर्वत्र चर्चेत असलेल्या त्या महाशक्तीचा यामागे हात आहे? शिवसेनेच्या फुटीमागे नेमकं कोण आहे, याची आतापर्यंत दबक्या आवाजात चर्चा होती. आम्ही बंडखोरी का केली, याचं शिंदे गटाकडून वारंवार स्पष्टीकरण देण्यात आलंय… तर जळगाव भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा यावर चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे आम्हीच शिवसेना फोडली, यावरून आता श्रेयवाद रंगतो की काय, अशी चिन्ह आहेत. शिवसेना फोडण्यामागे भाजपचा हात होता, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. भाजप नेत्याने प्रथमच अशा प्रकारे उघड भाष्य केलं. पण शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी महाजनांचं हे वक्तव्य खोडून काढलं.
गिरीश महाजन काय म्हणाले होते?
शिवसेना फोडणे हे भाजपचं मिशन होतं, अशी कबूली भाजप नेते गिरीश महाजन यांनी एका कार्यक्रमात दिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील हेसुद्धा उपस्थित होते. गिरीश महाजन म्हणाले, आधी आम्हाला सत्तांतरावर विश्वास बसत नव्हता. पण हळू हळू गोष्टी घडत गेल्या. एकनाथ शिंदे बाहेर पडले, त्यांच्या पाठोपाठ सैन्य बाहेर पडले.
संजय गायकवाड म्हणाले – ‘ गिरीश महाजन यांनी केलेलं हे विधान चुकीचं आहे. आम्ही भाजपमुळे शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही.. तर उद्धव ठाकरे घराच्या बाहेर येत नव्हते. आमची कुठलीच कामं होत नव्हती.. आम्हाला वर्षावर, मातोश्रीवर एन्ट्री नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे आम्हाला आपल्याच घरात साप पाळल्यासारखे वाटत होते. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही, असा खोचक टोला देखील आमदार संजय गायकवाड यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे…
