जळगाव मिरर । १० जुलै २०२३
राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात झाला. खान्देशात दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे अचानक झालेल्या वातावरणीय बदलामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे विमान धुळे येथे न उतरता थेट जळगाव येथे उतरून ते चारचाकीने धुळे मार्गस्थ झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आम्हाला पोहचायला थोडा उशीर होणार असून त्यामुळे आम्ही गिरीश महाजन यांना निरोप दिला की बाकीची भाषणं आटपून घ्या. जनतेला त्रास होता कामा नये. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आपल्याला एकमेकांना भेटायचं आहे. लोककल्याणकारी योजना आपल्याला लोकांपर्यंत पोहचवायच्या आहेत. गिरीश महाजन तुम्ही आता पालक मंत्री आहात, मी बघत होतो सगळी उत्तम आणि दिमाखदार व्यवस्था केली आहे. मी अशा प्रकारचा मंडप तर पाहिलाच नाही. पण आता तीन पक्षांचं सरकार आहे, दोन पक्षांचे झेंडे लावले तसे आता राष्ट्रवादीचे झेंडे लावायला सुरुवात करा अशी विनंती मी तुम्हाला करतो. जरी आपण इकडे, तिकडे असलो तरी प्रत्येकाचा उद्देश हा देशाचं भलं व्हावं आणि करीश्मा असणारं नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रुपाने मिळालं आहे.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
तुमचा माझा भारत देश हा जगाची महासत्ता बनला पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे. त्यामुळे ते देशपातळीवर काम करत आहेत. तेवढ्यात तडफेने, आत्मियतेने वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम केलं पाहिजे आणि प्रगत राष्ट्र अशी भारताची ओळख झाली पाहिजे. महाराष्ट्र हे युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांचं राज्य आहे. त्या राज्याचा लौकिकही आपल्याला वाढवायचा आहे आणि सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम आम्ही करु असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
