जळगाव मिरर | ४ नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यात एसीबी अनेक लाचखोर अधिकाऱ्यांना धडा शिकवीत असतांना एक मोठी कारवाई अहमदनगरमध्ये घडली आहे. एका सहाय्यक अभियात्याने हजार, लाख नव्हे तर तब्बल 1 कोटीची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
अहमदनगरमधील औद्योगिक विकास महामंडळ सहायक अभियंता अमित किशोर गायकवाड (वय 32) असे लाचखोराचे नाव आहे. त्याने तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्यासाठी लाच घेतली. या प्रकरणी दोघांविरोधातही गुन्हे दाखल झालेत. जुन्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडून ही लाच घेतली. ‘एमआयडीसी’तल्या कारभाराच्या हिमनगाचे केवळ हे टोक असल्याचे समजते. या प्रकरणामुळे भ्रष्टाचाराची पातळी कुठपर्यंत पोहोचली आहे, हे समोर येत आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या मापारी इन्फ्रा प्रोजेक्टस कंपनीचे मालक अरुण गुलाबराव मापारी यांनी नाशिकच्या लाचलुचतप प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने अहमदनगरजवळ सापळा रचून शुक्रवारी ही कारवाई केली. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली गेली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात खळबळ उडाली आहे.