जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२४
दूध वाहून नेणाऱ्या भरधाव वाहनाने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गुणवंत दत्तात्र्य क्षिरसागर (वय ४४) हे जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कळमसरा-शेंदुर्णी रस्त्यावर घडली. पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जंगीपुरा येथून दुधाच्या कॅन घेवून कळमसरा मार्गे पाचोरा जात असलेल्या (एमएच १९ सीआय ५७३१) क्रमांकाचे वाहन भरधाव वेगाने जात होते. यावेळी लोहाराकडून (एमएच १९ डीएन १७६२) क्रमांकाच्या दुचाकीवरुन लोहारायेथून गुणवंत क्षिरसागर हे येत होते. दरम्यान, भरधाव वाहनाने क्षिरसागर यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मोटार सायकलस्वार गुणवंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी धडक देणाऱ्या चालकाला ताब्यात देण्याची मागणी केली. परंतु पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, लोहारा पोलीस पाटील सुरेंद्र शेळके यांनी नागरिकांची समजूत काढीत वाहन चालक भूषण राजू चौधरी (वय २०) याला ताब्यात घेतले. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाचोरा येथे पाठवण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, काका असा परिवार आहे.
गुणवंत क्षीरसागर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असून ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते. तसेच ते शेंदुर्णी येथील राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेमध्ये लिपीक पदावर कार्यरत होते. दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने त्यांचा मृत्यू झाला. क्षिरसागर यांचा स्वभाव शांत आणि मनमिळावू होता, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतप्त नागरिकांकडून वाहनाची तोडफोड दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाने मोटरसायकल चालक गुणवंत क्षिरसागर यांना धडक दिल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी त्या वाहनाची नासधूस करत आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.