जळगाव मिरर | ४ फेब्रुवारी २०२६
नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी झालेल्या शासकीय कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याच्या मुद्द्यावरून मंत्री गिरीश महाजन अडचणीत सापडले आहेत. या घटनेनंतर महाजन यांनी जाहीर माफी मागितली असली, तरी बहुजन समाजातील नाराजी अद्याप ओसरलेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये महाजनांविरोधात बहुजन समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला.
नाशिकरोड ते शालिमार या मार्गावर निघालेल्या या मोर्चात बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच फलक आणि निदर्शनांद्वारे महाजनांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख न झाल्याने निर्माण झालेला संताप या मोर्च्यातून स्पष्टपणे व्यक्त होत होता. या आंदोलनामुळे नाशिक शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
आंदोलनकर्त्यांनी संविधानाचा सन्मान राखण्याची ठाम मागणी करत, प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी डॉ. आंबेडकरांचे नाव न घेणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले. महाजनांनी माफी मागूनही बहुजन समाजाची भूमिका कठोरच राहिल्याचे दिसून आले. या घटनेमुळे केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक स्तरावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, महाजनांसमोरील अडचणी याच मुद्द्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. एकीकडे सामाजिक रोष वाढत असताना, दुसरीकडे भाजपमधील पक्षांतर्गत घडामोडींमुळे महाजनांसाठी दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे. भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी अचानक राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. महाजनांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले असले, तरी पक्षांतर्गत नाराजी वाढत असल्याच्या चर्चा आधीपासून सुरू होत्या.
शहराध्यक्ष सुनील केदार यांनी निवडणूक प्रक्रियेतील निर्णयप्रक्रिया आणि स्थानिक नेतृत्वाला मिळालेल्या मर्यादित भूमिकेबाबत सविस्तर अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविल्याचे समजते. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना पुरेशी दखल न दिल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती, अशी चर्चा आहे. केदार यांच्या राजीनाम्यामुळे ही नाराजी उघडपणे समोर आली असून, नाशिक भाजपमधील अंतर्गत समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मात्र, या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्याचे वृत्त फेटाळले आहे. तरीही, आंबेडकरांच्या उल्लेखावरून निर्माण झालेला वाद, बहुजन समाजाचा आक्रमक मोर्चा आणि भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता यामुळे नाशिकचे राजकीय वातावरण अधिक तापले असून, पुढील काही दिवसांत पक्ष आणि प्रशासन कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





















