
जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२६
अमळनेर शहराजवळील दाजीबा नगर समोरील गलवाडे रस्त्यावर नव्याने तयार करण्यात आलेल्या उंच गतिरोधकामुळे आणखी एक गंभीर अपघात घडला असून, या अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित कामाच्या दर्जाबाबत संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मुडी-मांडळ येथील गायत्री प्रशांत सूर्यवंशी (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्या पती डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह दुचाकीने मुडीहून अमळनेरकडे जात होत्या. दाजीबा नगर परिसरातील गलवाडे रस्त्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या गतिरोधकाची उंची जास्त असल्याने त्यांच्या दुचाकीने अचानक त्यावर धडक दिली.
या धडकेत मागे बसलेल्या गायत्री सूर्यवंशी या तोल जाऊन खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तात्काळ अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच २ एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. गायत्री सूर्यवंशी यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, संबंधित गतिरोधकाच्या उंचीबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अवघ्या पाच ते सहा दिवसांच्या कालावधीत याच ठिकाणी तीन ते चार अपघात घडल्याची माहिती समोर येत असून, निकृष्ट नियोजन आणि निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याची चर्चा रंगली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या गतिरोधकाची दुरुस्ती करावी तसेच अशा धोकादायक रस्ते बांधकामांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.





















