
जळगाव मिरर | २७ जानेवारी २०२६
कुत्रा हा एकमेव असा पाळीव प्राणी आहे, जो स्वतःपेक्षाही अधिक प्रेम आपल्या मालकावर करतो, याची पुन्हा एकदा प्रचिती देणारी हृदयद्रावक घटना हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील भरमौर येथून समोर आली आहे. कडाक्याच्या थंडीत, शून्य अंशाखाली तापमान असताना एका पिटबुल कुत्र्याने आपल्या मृत मालकाची तब्बल चार दिवस साथ न सोडता निष्ठेचे जिवंत उदाहरण सादर केले आहे. हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भरमौरमधील भरमणी मंदिर परिसरात विकसित राणा आणि पियुष हे दोन तरुण व्हिडिओ शूटिंगसाठी गेले होते. मात्र अचानक हवामान बिघडले आणि प्रचंड हिमवृष्टी झाल्याने हे दोघेही तिथेच अडकले. बर्फाखाली दबले गेल्याने दोन्ही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चार दिवसांनंतर बचाव पथक आणि स्थानिक ग्रामस्थ बेपत्ता तरुणांचा शोध घेत घटनास्थळी पोहोचले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले.
पियुषचा मृतदेह बर्फाखाली गाडलेला होता, मात्र त्याचा पाळीव पिटबुल कुत्रा त्याच ठिकाणी खंबीरपणे बसून पहारा देत होता. गेल्या चार दिवसांपासून या मुक्या प्राण्याने अन्नाचा एक कणही घेतला नव्हता. हाडं गोठवणारी थंडी, वेगवान वारे आणि सततची हिमवृष्टी सहन करत त्याने आपल्या मालकाच्या मृतदेहाचे रक्षण केले. केवळ निसर्गाच्या कोपापासूनच नव्हे, तर जंगली श्वापदांपासूनही त्याने मालकाचे संरक्षण केल्याचे सांगितले जात आहे.
बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, सुरुवातीला कुत्र्याने आक्रमक पवित्रा घेतला. अनोळखी व्यक्ती मालकाला इजा पोहोचवतील, अशी त्याला भीती वाटत असावी. मात्र, बराच वेळ त्याला शांत करून विश्वासात घेतल्यानंतर, हे लोक मदतीसाठीच आले असल्याची खात्री पटताच तो बाजूला झाला. त्यानंतर प्रशासनाला मृतदेह ताब्यात घेणे शक्य झाले. मालकावरच्या निस्सीम प्रेमाची आणि निष्ठेची साक्ष देणारा हा प्रसंग सध्या देशभरात भावनिक प्रतिक्रिया उमटवत असून, ‘कुत्रा खरंच माणसाचा सर्वात निष्ठावान मित्र आहे’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.




















