अमळनेर : विक्की उत्तम जाधव
प्रशासनाच्या विरोधातील आंदोलनाबाबत धरणाची सूप्रमा लवकर मिळेल यादृष्टीने प्रशासन कार्यवाही करीत असल्याचे तापी पाटबंधारे महामंडळाचे पत्र खा. उन्मेष पाटील यांनी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्यासमोर सादर केली. राज्यशासनाच्या मंत्री मंडळाची मान्यता तातडीने मिळावी म्हणून एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता असून शेतकरी पुत्र म्हणून समितीच्या पुढील आंदोलनात मी सहभागी असेल असेही खा. उन्मेश पाटील यांनी यावेळी समितीच्या बैठकीत सांगितले असले तरी समितीने यापुढे दीर्घ आंदोलनाच्या तयारीला लागण्याचा निर्णय घेतला आहे
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीने खा उन्मेश पाटील यांनी प्रशासनाने गतिमानतेने काम करावे म्हणून दिलेल्या एक महिन्याच्या अल्टिमेटेंवर समितीनेही खासदार पाटील यांना आंदोलनाबाबत आव्हान दिले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समितीची महत्त्वपूर्ण बैठक डॉ. आंबेडकर चौक येथील कार्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी खा. पाटील यांनी सदर बैठकीत उपस्थिती देऊन आपली भूमिका व धरणा संदर्भात करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती विशद केली. धरणाचे संदर्भातील सुप्रमा व इतर मान्यता राज्य शासनाने तातडीने पूर्ण कराव्या म्हणून आपण आंदोलनाची भूमिका घेतली होती त्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी मुंबई येथे बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करत असल्यामुळे आपल्याला प्रशासनाने आंदोलन मागे घेण्यास विनंती केली आहे असे खा.पाटील यांनी सांगितले.
तापी महामंडळाच्या पत्रावर समितीने अल्प समाधानी असल्याचे सांगितले असून राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकीत सदर सुप्रमा प्रस्तावाची मंजुरी तातडीने होण्याच्यादृष्टीने समितीसह सर्वांनी पुढाकार घेऊन दबाव निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. निवडणुकांना कमी कालावधी शिल्लक असताना शासनाने तातडीने या संदर्भात भक्कम पावले उचलून सदर प्रस्ताव कॅबिनेट समोर ठेवून तातडीने मंजूर करावा व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणासाठी कॅबिनेटमध्ये पंधराशे कोटी देण्याचा घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी किंवा सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन सदर प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी शिफारस करावा यासाठी दिर्घ व अचानक आंदोलनाच्या तयारीचा निर्णय समितीच्यावतीने घेण्यात आला असल्याचे समिती प्रमुख सुभाष चौधरी यांचेसह रणजित शिंदे, हेमंत भांडारकर,प्रताप साळी, रविंद्र पाटील, महेश पाटील,विजय पाटील यांनी याप्रसंगी झालेल्या चर्चेदरम्यान खा.पाटील यांना सांगितले.
सदर बैठक सात वाजेपासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत चालली यावेळी खा. पाटील यांनी दीड तास उपस्थिती देत आंदोलन सोबत चर्चा केली. सदर बैठकीस सुनील पाटील,प्रशांत भदाणे,रामराव पवार,देविदास देसले, आर बी पाटील,पुरुषोत्तम शेटे, गोकुळ पाटील,सुरेश पाटील, सुभाष देशमुख, प्रसाद चौधरी, प्रविण संदानशिव, नारायण बडगुजर, आदिनी सहभाग घेतला.याप्रसंगी मा जि प सदस्य ॲड. व्ही. आर. पाटील, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील उपस्थित होते.