जळगाव मिरर | २९ जुलै २०२५
शहरातील सम्राट कॉलनीतील गल्लीत दोन वर्षांकरीता हद्दपार केलेला पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर (वय २५, रा. तुकारामवाडी) हा चॉपर घेवून दहशत माजवित असतांना एमआयडीसी पोलिसांनी पकडले. ही कारवाई दि. २८ रोजी केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार केलेला संशयित पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर हा सम्राट कॉलनीत हातात लोखंडी चॉपर घेवून दहशत माजवित होता. ही माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, गणेश शिरसाळे, संदीप सपकाळे, विकास सातदिवे व योगेश घुगे यांचे पथक रवाना केले. हे पथक सम्राट कॉलनीत गेले असता, पोलिसांना बघताच पवन उर्फ बद्या बाविस्कर हा त्यांना पाहून पळून जात होता. यावेळी पथकाने त्याचा पाठलाग करीत मुसक्या आवळल्या. त्याच्याजवळून धारदार चॉपर हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
