जळगाव मिरर | १५ मार्च २०२५
गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे आता याचा फटका राज्यातील जनतेला सुद्धा बसला आहे. आजपासून दूध दरात वाढ करण्यात आली आहे. बुधवार (ता. १२) रोजी दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली. संघाच्या मुख्यालयात सहकारी व खासगी दूध संघाची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीला दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक संघटनेचे ४७ सदस्य उपस्थित होते. या बैठकीत गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे, दुसरीकडे दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यातील चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा भाव देण्यासाठी दूध दरवाढ करावी लागल्याची माहिती प्रकाश कुतवळ यांनी दिली आहे.
यावेळी भेसळ आणि शेतकऱ्यांचे थकीत अनुदान लवकरात लवकर मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव मस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ आदींनी यांनी दिली.
या बैठकीमध्ये जिल्ह्यासह राज्यभर नकली पनीर व पनीर भेसळ रोखण्यासाठी जनजागृती, उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. सध्या सगळीकडे पनीर म्हणून अनलॉगचीजची विक्री केली जात आहे, याप्रकरणी भेसळखोरांवर कडक कारवाईची मागणी करण्याबाबत आणि शेतकऱ्यांचे थकीत अनुदान लवकरात लवकर मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव मस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ आदींनी यांनी दिली.
दरम्यान, आज 15 मार्च शनिवारपासून गाय दूध दर प्रति लिटर ५६ रुपयांवरून ५८ रुपयांना विकले जाणार आहे. तर म्हैस दूध दर प्रति लिटर ७२ रुपये रुपयांवरून ७४ रुपये दराने दिले जाणार आहे.