
जळगाव मिरर | २८ मार्च २०२६
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील गुणामा गावच्या एका दांपत्याचा देवदर्शनाचा प्रवास अचानक रक्तरंजित प्रकरणात बदलला. अफझलपूरजवळील बळुरगी (कर्नाटक) येथे संतप्त पतीने आपल्या पत्नीची अमानुष मारहाण करून अंगावर थेट कार घालून तिला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी अफझलपूर पोलीसांनी आरोपी पती अक्षय याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेले अक्षय आणि त्याची पत्नी शैलजा (३५) गुरुवारी गाणगापूर येथील दत्त दर्शनासाठी कारने निघाले होते. अक्कलकोट ओलांडून बळुरगी गावाजवळ पोहोचल्यावर कौटुंबिक कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद हळूहळू हाणामारीत रूपांतरित झाला. आरोपी पतीने शैलजा यांना कारबाहेर ओढून बेदम मारहाण केली.
महिलेच्या आक्रोशामुळे परिसरातील नागरिकांनी पतीला शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने शांत झाल्याचे नाटक केले, मात्र नागरिक निघून गेल्यानंतर त्याने पुन्हा क्रौर्याचा मार्ग अवलंबला. विव्हळत असलेल्या शैलजा यांच्या अंगावरून अक्षयने थेट कार घालली, ज्यामुळे महिलेचा मृत्यू झाला.
अफझलपूरचे सीपीआय लखन आणि पीएसआय सोमलिंग वडेयर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलबुर्गी जिल्हा पोलीस अधीक्षक अडुरू श्रीनिवासलू आणि डीवायएसपी तम्मराय पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासास मार्गदर्शन केले आहे.
प्राथमिक तपासात ही हत्या अनैतिक संबंधांच्या संशयामुळे झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. देवदर्शनाच्या निमित्ताने आरोपीने हा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अफझलपूर पोलीस तपास सुरू ठेवून संबंधित कुटुंबाला घटनाबाबत माहिती देत आहेत.






















