जळगाव मिरर | ३० जुलै २०२५
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेत ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी आणखी गंभीर आरोप करत राज्य सरकारवर थेट सवाल उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी सांगितले की, केवळ काही सेकंद नव्हे तर कोकाटे यांनी विधान परिषदेत तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळल्याचा उल्लेख विधिमंडळाच्या चौकशी अहवालात आहे. हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करण्यात आला असून, आता कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहित पवारांचे प्रश्न सरकारला थेट
ट्विटर (X) हँडलवरून रोहित पवार यांनी म्हटले आहे की, “सभागृहात केवळ 42 सेकंद नव्हे, तर 18-22 मिनिटे कृषिमंत्री पत्ते खेळत होते. याचा तपशील अहवालात नमूद आहे. आता सरकार कारवाई करणार की नाही? जर कोकाटे यांच्यावर कारवाई केली नाही, तर मुख्यमंत्री अटलजींचा आणि उपमुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार त्यांना राहील का?” या प्रकरणामुळे महायुती सरकारच्या शिस्तबद्ध कारभाराच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
