जळगाव मिरर । २३ डिसेंबर २०२२
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आल्याने राजकीय चर्चेला चांगलेच उधान आले आहे. नागपूरात ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली. ही नियुक्तीपत्रे देतानाच कार्यकर्त्यांमध्ये प्राणही फुंकले. तुम्हाला उभं राहायचं असेल तर जीवाचं रान करून काम करा. येईल त्या संकटाला सामोरे जा. घाबरू नका. विरोधक तुम्हाला हसतील. तुमचा अपमान करतील. अपमान सहन करा. मन घट्ट करा. फक्त जमिनीवर पाय रोवून उभं राहा. यश नक्कीच आपलं आहे, असं सांगत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकले.
राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी छोटेखानी सभा झाली. या सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा ऐकवून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. सुधीर जोशी महापौर असतानाची हा किस्सा आहे.
एके दिवशी बाळासाहेबांना बाहेर जायचं होतं. पण त्या दिवशी ड्रायव्हर आला नाही. त्यामुळे टॅक्सी मागवण्यात आली. तेवढ्यात तत्कालीन महापौर सुधीर जोशी आपल्या लाल दिव्याच्या गाडीसह मातोश्रीवर आले. त्यांनी बाळासाहेबांशी चर्चा केली. त्यानंतर बाळासाहेबांनी शिवसेना भवनात जाण्यासाठी टॅक्सी मागवल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा तुम्हा माझ्यासोबत चला. लालदिव्याच्या गाडीतून मी तुम्हाला शिवसेना भवनात सोडतो असं ते म्हणाले. तेव्हा तुम्ही तुमच्या गाडीत बसा. मी टॅक्सीने जातो असं बाळासाहेब म्हणाले.
त्यानंतर बाळासाहेब टॅक्सीत बसले. माझ्या डोळ्यासमोर मी जे चित्रं पाहिलं ते वेगळचं होतं. पुढे टॅक्सी जात होती. आम्ही टॅक्सीत होतो. टॅक्सी चालली आहे. टॅक्सीच्या मागून लाल दिव्याची गाडी येत होती… पॉवर कशाला म्हणतात ना… ताकद कशाला म्हणतात ना… ताकद त्या टॅक्सीत बसली होती. लाल दिवा मागून येत होता. हे चित्र ज्या मुलाने लहानपणी पाहिलं असेल त्याला या गोष्टींचं कौतुक काही असेल का हो? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर पण मला टॅक्सीत आणू नका एवढी विनंती आहे तुम्हाला, असं राज यांनी हात जोडून म्हणताच एकच खसखस पिकली. पॉवरही अशी असते. आमदार, नगरसेवक, खासदार या सर्व पदावर तुम्हालाच बसायचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला जीवाचं रान करावं लागेल. प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. अपमना सहन करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.