जळगाव मिरर । २१ ऑक्टोबर २०२२
उत्तराखंडला नवीन प्रकल्पांचं गिफ्ट मिळणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून केदारनाथ आणि बद्रीनाथच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर दोन्ही धामांचे पुजारी आणि भाविकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे. पीएम मोदींनी त्यांच्या भेटीत चंबा येथील महिलांना दिलेलं वचनही पाळलं आहे. पीएम मोदी बाबा केदारनाथांच्या पवित्र भूमीत असून या शुभप्रसंगी त्यांनी हिमाचल प्रदेशातील चंबा महिलांनी स्वत: हातांनी बनवलेला पोशाख परिधान केला आहे.
या पोशाखाला ‘चोला डोरा’ असं म्हणतात. हा पोशाख पंतप्रधानांना त्यांच्या नुकत्याच हिमाचल प्रदेश भेटीत भेट देण्यात आला होता आणि त्यावर अतिशय सुरेख हस्तकला आहे. चंबा इथं नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी महिलांना वचन दिलं होतं की, कोणत्याही थंड ठिकाणी प्रवास करताना या पोशाखाचा वापर केला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. आज हा पोशाख परिधान करून त्यांनी आपलं वचन पूर्ण केलं आहे.
Uttarakhand | PM Modi arrives in Kedarnath, he will be inaugurating various connectivity projects there pic.twitter.com/vy8HHGet3d
— ANI (@ANI) October 21, 2022
पीएम मोदींची भेटी आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिराला 10 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं आहे. यावेळी मोदींनी नतमस्तक होऊन बाबा केदारनाथाचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे, पीएम मोदींची या वर्षातील ही सहावी केदारनाथ भेट आहे. पंतप्रधान मंदिरात जागतिक शांतता आणि विश्व कल्याणासाठी महाभिषेक देखील करणार आहेत.
केदारनाथला मिळणार जगातला सर्वात लांब रोपवे
या भेटीत पंतप्रधान मोदी केदारनाथला जगातील सर्वात लांब रोपवे या दिवाळीत भेट म्हणून देणार आहेत. रोपवे प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. सोनप्रयाग-केदारनाथ या रोपवेच्या उभारणीमुळं भाविकांच्या जीविताला आणि मालमत्तेला होणारा धोका कमी होईल. यासह प्रवास सुलभ, सुरक्षित आणि सोपा होईल. हा रोपवे समुद्रसपाटीपासून 11,500 फूट उंचीवर असेल. 11.5 किमी लांबीचा हा रोपवे असणार असून यामुळं 16 किमीचा प्रवास अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे.