जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५
सांगली जिल्ह्याच्या विटा परिसरात मध्यरात्री पोलिसांच्या एका पथकाने एका वकिलाच्या घरात जबरदस्तीने घुसून त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पोलिसांनी मात्र, वकिलांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई केल्याचे सांगितले आहे.
या घटनेनंतर वकिल संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त करत जिल्ह्यातील सर्व वकिलांनी एक दिवसाचा कामबंद पुकारला आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची तातडीने चौकशी आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विटा शहरात पोलिसांनी वकिलावर केलेल्या मारहाणीप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नवी माहिती समोर आली आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून काही पोलिस रात्री गुंडांच्या शोधात परिसरात फोटो काढत फिरत होते, ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. वकील विशाल कुंभार यांनी याबाबत तक्रार केली होती.
तक्रारीनंतर पोलिसांनी एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ८-१० पोलिसांसह वकिलाच्या घराजवळ येऊन वाद घातला आणि नंतर अर्ध्या कपड्यात वकिलाला जबरदस्तीने घरातून बाहेर खेचून पोलिस ठाण्यात नेले. या घटनेमुळे वकिल संघटना संतप्त असून पोलिसांच्या या कृत्यावर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
