जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२५
भाडेतत्वावर घेतलेल्या घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी व शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणाहून देहविक्री करणाऱ्या दोन महिलांची सुटका करण्यात आली असून कुंटणखाना चालविणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सोमवारी सायंकाळच्या सुमारास योगेश्वर नगरात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील योगेश्वर नगर भागात भाडेतत्वार राहणाऱ्या घरात कुंटणखाना सुरुअसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकासह शनिपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला कुंटणखाना सुरु असलेल्या घरात पाठविले. संबंधित ठिकाणी पंधराशे रुपयांमध्ये सौदा ठरला. पंटरने आत जाऊन खात्री करताच बाहेर दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाला मोबाईलवर ‘मिस कॉल’ देऊन इशारा केला. इशारा मिळताच क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी घराला घेराव घालत छापा टाकला.
पोलिसांनी घटनास्थळावरून कुंटणखाना चालवणाऱ्या मुख्य मालकासह दोन पीडित महिलांना ताब्यात घेतले आहे. भरवस्तीत सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. ही धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रविंद्र मोतीराया, आवेश शेख, अमोल ठाकूर, प्रणय पवार, महिला पोलीस कर्मचारी स्मिता पाटील यांच्या पथकाने केली.




















