जळगाव मिरर | २१ मार्च २०२४
चोपडा शहरातील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा पोलिसांच्या पथकाने २० रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत एकूण ५० महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कुंटनखाना चालवणाऱ्या ११ महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पालिकेच्या पाठीमागील परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्यातील निरीक्षक मधुकर सावळे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमालकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने कारवाई केली. पथकाने सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात जिल्ह्यासह परराज्यातील ५० तरुणी आढळून आल्या आहेत. तर कुंटणखाना चालवणाऱ्या ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या परिसरात पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, नेपाळमधील तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणल्या जातात. त्यावर वचक बसण्यासाठी झालेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.