जळगाव मिरर । ५ डिसेंबर २०२२
राज्यात खडसे व महाजन यांचा वाद नेहमी उफाळून आलेला आहे. पण जळगाव जिल्ह्यात जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्याने हा वाद आता मोठ्या जोशात सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत खडसे विरूद्ध महाजन असेच पाहिले जात आहे. पण मुक्ताईनगर मतदार संघात खडसे परिवारात अनोखे युद्ध पहावयास मिळत आहे. म्हणजेच जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत सासू मंदाकिनी खडसे यांनी अर्ज केला आहे तर त्यांच्या विरूद्ध सून खासदार रक्षा खडसे प्रचार करीत महाजन यांच्याकडून प्रचार करीत आहेत.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुक अंतिम टप्प्यात येवून पोहचली आहे. निवडणुकीसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत महाविकास विकास आघाडी विरुद्ध भाजप व शिंदे गट मैदानात आहेत. जिल्ह्यातील सध्याचे राजकारण हे एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्या भोवती फिरत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे या निवडणुकीत दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहेत.
मुक्ताईनगरातून महाविकास आघाडीच्या पॅनलकडून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार आमदार मंगेश चव्हाण उभे आहेत. आमदार चव्हाण यांच्या प्रचारार्थ रविवारी खडसेंच्या बालेकिल्ल्यात अर्थात मुक्ताईनगर येथे शिंदे– भाजप गटाच्या शेतकरी पॅनलचा मेळावा झाला. मुक्ताईनगरातून उमेदवार असलेल्या खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात प्रचारासाठी असलेल्या मेळाव्यात खडसेंच्या सूनबाई खासदार रक्षा खडसेंची उपस्थिती होती. सासू विरोधात सुनेच्या प्रचाराची लढाई राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे.