जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२६
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे नमाज पठण सुरू असताना एका मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या भीषण स्फोटात किमान 50 जणांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार सुरुवातीला मृतांचा आकडा 10 असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र नंतर तो मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले. जखमींना पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) आणि CDA हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हा स्फोट पाकिस्तानात अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे. स्फोटानंतर घटनास्थळी मृतदेहांचे अवयव विखुरलेले दिसून आले. प्राथमिक तपासात हा आत्मघातकी बॉम्बहल्ला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि लष्कराच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून संपूर्ण परिसराला कडेकोट बंदोबस्तात घेण्यात आले आहे. स्थानिक मीडियानुसार हा स्फोट तारलाई भागातील कसर-ए-खदीजतुल कुबरा मशिदीत झाला असून या मशिदीला ‘बडी मशीद’ म्हणूनही ओळखले जाते.
घटनेनंतर काही व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये घाबरलेले नागरिक सैरावैरा पळताना दिसत आहेत. स्फोटानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ज्या मशिदीत हा हल्ला झाला ती शिया समुदायाची मशीद असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये शिया समुदायाची लोकसंख्या सुमारे 2 कोटी असून ती देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 10 ते 12 टक्के आहे.
उल्लेखनीय म्हणजे, नोव्हेंबर 2025 नंतर इस्लामाबादमध्ये झालेला हा दुसरा मोठा स्फोट आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये इस्लामाबाद जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू आणि 36 जण जखमी झाले होते. त्या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने स्वीकारली होती.




















