जळगाव मिरर | २२ जानेवारी २०२६
भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेच्या गटनेतापदी नगरसेवक प्रकाश बालाणी यांची निवड करण्यात आली आहे. तर उपगटनेतेपदी नितीन बरडे आणि प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीची अधिकृत गट नोंदणी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली.
महापालिका निवडणुकीत महायुतीने सत्ता काबीज केली असून भाजपाचे तब्बल ४६ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीचा निकाल राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर आता विविध राजकीय पक्षांकडून गटनेते पदाच्या निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, गुरुवारी मंत्रालयात महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असून या सोडतीकडे राजकीय वर्तुळासह जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
गट नोंदणीसाठी भाजपाचे सर्व नगरसेवक बुधवारी नाशिकला रवाना झाले होते. याठिकाणी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदासाठी प्रकाश बालाणी यांच्या नावावर एकमत झाले. त्यानुसार त्यांची भाजप महापालिका गटनेतेपदी निवड करण्यात आली.
तसेच महापालिकेतील अनुभवी नगरसेवक नितीन बरडे यांची उपगटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे प्रभाग क्रमांक ९ मधून दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. युवा नगरसेवकाला प्रतोदसारखी महत्त्वाची जबाबदारी देत भाजपाने महापालिका राजकारणात धक्कातंत्राचा अवलंब केल्याची चर्चा सुरू आहे.




















