
जळगाव मिरर / २२ नोव्हेंबर २०२२
जळगाव जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांचा प्रश्न गंभीर असून २००७ पासून ठेवीदारांना न्याय मिळालेला नाही. संस्थांच्या वसुली होत असून सुद्धा ठेवी दारांना त्यांच्या ठेवी परत दिल्या जात नसल्याने त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या संदर्भात जळगाव शहराचे आमदार अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत असून आज दिनांक.२२/११/२०२२ रोजी आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी ठेवीदारांना सोबत घेऊन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. श्री. अतुलजी सावे यांची भेट घेऊन ठेवीदारांचा प्रश्न मंत्री महोदायांसमोर उपस्थित केला.
त्यावर सकारात्मक प्रतिसाद दाखवीत माननीय सहकार मंत्री अतुल सावे “लवकरच ठेवीदारांच्या मागण्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी पॅकेज मंजूर केला जाईल व ठेवीदारांना त्यांच्या रक्कमा परत दिल्या जातील” असे सांगितले. आ. राजुमामांच्या या अनमोल सहकार्यामुळे जिल्ह्यातील ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला असून सर्व ठेवीदारांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सुरेश भोळे यांचे आभार मानले आहे.




















