जळगाव मिरर | ३ फेब्रुवारी २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच जळगावातील एका तरुणाने प्रेमाचे ढोंग, लग्नाचे सोंग करीत एका तरुणीशी नोंदणी पद्धतीने लग्न करीत अत्याचार केल्याची खळबळजनक घटना जळगावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरूणासह ९ जणाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका बँकेमध्ये गेल्यानंतर विवाहितेची एका तरुणाशी ओळख झाली, तरुणाने जवळीक साधत मैत्री केली व नंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. त्यानंतर नोंदणी विवाह केला खरा, पण महिलेला घरी नांदण्यास न नेता तिच्यावर वेळोवेळी जळगावसह पुणे येथे नेऊन अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने अत्याचार करणाऱ्या ईश्वर गोविंद व्यास (रा. इंद्रप्रस्थ नगर) याच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका २९ वर्षीय विवाहितेची शहरातील एका खासगी बँकेत ईश्वर व्यास याच्याशी ओळख झाली. त्या वेळी त्याने विवाहितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मी विवाहित असल्याचे महिलेने सांगितले. मात्र तरीदेखील दोघांची मैत्री झाली व नंतर त्यातून हळूहळू प्रेम फुलत गेले. त्या वेळी व्यास याने विवाहितेचा विश्वास संपादन करत नोंदणी पद्धतीने विवाह केला. या प्रसंगी त्याचे काही नातेवाईक व मित्र यासाठी हजर होते. मात्र लग्नानंतर व्यास याने महिलेला घरी नांदण्यास न नेता २ जानेवारी २०२३ ते ३ नोव्हेंबर २०२३ या दरम्यान जळगाव शहरासह व पुणे येथे नेऊन वेळोवेळी महिलेच्या संमतीशिवाय शरीरसंबंध प्रस्थापित केले. सतत तिचा छळ करत फसवणूक करण्यात आल्याने विवाहितेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ईश्वर व्यास याच्यासह नातेवाईक, मित्र अशा एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.