जळगाव मिरर | संदीप महाले
गेल्या काही वर्षापासून जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या गुन्हेगारी मध्ये छोट्या-मोठ्या चोऱ्या असो की घरफोड्या याशिवाय अवैध जुगार, सट्टा, वाळू चोरी यासह अनेक गुन्हेगारीच्या विळख्यात जळगाव जिल्ह्यातील तरुण मोठ्या प्रमाणात अडकला जात आहे. याला केवळ राजकीय नेत्यांचे आश्वासनासह कृतीच्या अभावामुळे जिल्ह्यातील तरुण गुन्हेगारीच्या सावलीत जातोय का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण शहरी भागातील तरुण आज उच्चशिक्षित असला तरी जळगाव जिल्ह्यात रोजगार नसल्याने ते पुणे नाशिक मुंबई सारख्या मोठ्या शहरात जाऊन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहे. मात्र या ठिकाणी देखील अनेक तरुणांना हाताला काम मिळत नसल्याने ते पुन्हा माघारी फिरत आहे. त्यानंतर आपल्या परिसरात मिळेल ते काम करीत आहे. मात्र त्यावर देखील उदरनिर्वाह होत नसल्याने जिल्ह्यातील तरुण आता चक्क गुन्हेगारीचे उद्योग सुरू करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने तयार होत आहे तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे यावर पोलीस प्रशासन किती अंकुश ठेवणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक गुन्हेगारीच्या ठिकाणी थेट राजकीय नेत्याचा फोन येत असल्याने हे गुन्हेगार मोकाट सुटत आहे. मात्र या तरुणांना गुन्हेगारीचा मार्ग नेमका दाखवला कुणी हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. यावर जळगाव जिल्ह्यात उद्योग कुठल्याही प्रमाणात नसल्याने या तरुणांना गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारत राजकीय नेत्यांचे संरक्षण घ्यावे लागत असते. त्यामुळे ते काही दिवस का होईना उद्योग चांगल्या पद्धतीने चालवत असतात.
जिल्ह्यातील वाळू चोरी मोठ्या प्रमाणात !
जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात गिरणा व तापी नदी आहे. या नदीपात्रातून परिसरातील अनेक तरुण रात्रंदिवस अवैध वाळू चोरी करीत असतात. ही वाळू चोरी रोखण्यासाठी शासन व प्रशासन हतबल झाले आहे. तर काही ठिकाणी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उचलला असता त्यांना थेट राजकीय नेत्यांचे फोन आल्यावर त्यांना देखील तेथून माघारी फिरावे लागत असते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना गुन्हेगारीच्या विळख्यात नेमके अडकवतय कोण व या अवैध उद्योगांना छुपा पाठिंबा देते कोण हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे.
एमआयडीसीत कंपनी आहे मात्र उद्योग नाही
जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेते नेहमीच जळगाव शहरात एमआयडीसी आहे या ठिकाणी मोठे अनुदान आणले आहे मात्र या ठिकाणी कुठलेही नवीन कंपनी आणली नाही. ही केवळ राजकीय नेत्यांची आश्वासनेच राहिली मात्र जळगाव जिल्ह्यातील अनेक तरुण या एमआयडीसी परिसरात काही कंपन्यांमध्ये काम करत आहे त्यांना देखील तीनशे रुपये याच्यावर कुठलीही रोजंदारी मिळत नाही या ठिकाणी अनेक तरुण उच्चशिक्षित असल्यावर देखील त्यांना छोटे मोठे काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. राज्यातील महायुती सरकार नेहमीच उच्चशिक्षित तरुणांसाठी अनेक योजना काढत असते मात्र या योजनेत खरोखर गरजू तरुणांपर्यंत पोहोचत आहे का याचा देखील विचार सरकारने केला पाहिजे.
