अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जळगाव जिल्ह्यातील अनेक गावातील रस्त्याची मोठी दुर्देशा झाली असून जिल्ह्यातील सर्वच आमदारासह नेते या प्रश्नाचा पाठपुरावा करीत असतांना अमळनेर मतदारसंघातील ग्रामीण भागात दळणवळणास गती मिळून शेतकरी बांधवांना शेतीपूरक व्यवसाय करण्यास चालना मिळावी, यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चार महत्वपूर्ण रस्त्यांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे.
सुमारे २ कोटी निधीतून हे रस्ते होणार असल्याची माहितीही मंत्री पाटील यांनी दिली. शासनाच्या ग्रामविकास विभागाचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध झाला. चारही रस्ते जवळचे मार्ग असून अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने लोकांना पर्यायी रस्ता म्हणून फेऱ्याने जावे लागत होते. मात्र मंत्री पाटील यांनी लोकांचा त्रास लक्षात घेऊन हे रस्ते मंजूर करून आणले आहेत. या रस्त्यामुळे बोरी काठ तसेच जळोद व अमळगाव परिसरातील गावांना चोपड्याकडे गतीने जाता येणार असून यामुळे अमळनेर, चोपडा व धरणगाव या तीन तालुक्याच्या बाजारपेठेशी त्यांचा संपर्क गतिमान होणार आहे. मंगरूळ परिसरातील गावांना फाफोरे, बहादरपूरकडे जाणारा जवळचा मार्ग गतिमान होणार आहे. शिरपूर जवळील नवीन रस्ताही अनेक गावांसाठी वरदान ठरणार आहे.