जळगाव मिरर | २९ नोव्हेबर २०२३
गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात छोट्या मोठ्या चोरीच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच जळगाव तालुक्यातील कंडारी गावात बंद घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत तिजोरी ठेवलेले रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून नजीक असलेल्या कंडारी येथील महेंद्र माधव परदेशी (वय-४५) हे दि.१७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांनी घर बंद करून ते कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १७ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान घर बंद असताना घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटाच्या तिजोरी ठेवलेले दीड लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ७० हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महेंद्र परदेशी हे घरी आले. त्यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले, तर घरातील सामान अस्तव्यस्थ पडलेला दिसून आला. त्यानंतर त्यांनी मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.