जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२५
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे एक निवेदन देण्यात आले आहे, ज्यामध्ये शासन निर्णयाचा हवाला देत कार्यालयाकडून पाठवलेल्या इंग्रजी भाषेतील पत्रांचे मराठीत भाषांतर करण्याची विनंती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक ३० मार्च २०१५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी आपले व्यवहार व पत्रव्यवहार पूर्णपणे मराठी भाषेत करणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक कामगार वर्गासाठी इंग्रजी भाषेतील पत्रे समजून घेणे कठीण असल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाबतीत तातडीने लक्ष देण्याची मागणी करत आहे.
सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले की, शासनाच्या या स्पष्ट धोरणाचा आदर करून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने पूर्वी पाठविलेल्या इंग्रजी पत्रांचे संपूर्ण मराठी भाषांतर करावे. तसेच, पुढील सर्व पत्रव्यवहार व सार्वजनिक सूचना पूर्णपणे मराठीतच करण्यात याव्यात, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भिल, राहुल चव्हाण, साजन पाटील, दीपक राठोड व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.




















