जळगाव मिरर / ५ जानेवारी २०२३
रामभक्तांना उत्सुकता असलेल्या अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी गतीने काम सुरु असून मंदिर उभारणीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्रिपुरामध्ये भाजपच्या जनविश्वास यात्रेच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अयोध्येत राम मंदिर उभारणीची तारीख जाहीर केली. ते म्हणाले- 1 जानेवारी 2024 पर्यंत मंदिर तयार होईल. त्यांनी त्रिपुरातील लोकांना तिकीट बुक करण्यास सांगितले.
अमित शहा म्हणाले – 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचा अध्यक्ष होतो आणि राहुल बाबा काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे – मंदिर वहीं बनाएंगे तिथि नहीं बताएंगे. तर राहुल बाबा, कान उघडे ठेवून ऐका, 1 जानेवारी 2024 ला तुम्हाला अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर तयार मिळेल.
केवळ राम मंदिरच नाही तर एक-दोन वर्ष जाऊ द्या, माँ त्रिपुरा सुंदरीचं मंदिरही इतकं भव्य बांधलं जाईल की संपूर्ण जग बघायला येईल. काशी विश्वनाथचा कॉरिडॉर बनवला, महाकालचा कॉरिडॉर बनवला. सोमनाथ आणि अंबाजीचे मंदिर सोन्याचे बनवले जात आहे. माँ विंध्यवासिनीचे मंदिर नवीन बांधले जात आहे. श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सदस्य डॉ.अनिल मिश्रा सांगतात की, मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. जन्मभूमीवर सध्या 350 मजूर आणि कारागीर रात्रंदिवस काम करत आहेत. यासोबतच राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील वंशी पहारपूरमध्ये सुमारे एक हजार मजूर आणि कारागीर काम करत आहेत. येथे ते मंदिरात वापरण्यात येणारे दगड कोरण्याचे काम करत आहे. येथून मंदिरात गुलाबी दगड आणले जात आहेत.