जळगाव मिरर | २५ नोव्हेबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहे. सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचंच सरकार आलं आहे. राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला सर्वात कमी जागा मिळाल्या आहेत.
या निवडणुकीत काँग्रेसला 16, उद्धव ठाकरे गटाला 20, शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या. तर भाजपला 132, शिंदे गटाला 57 आणि अजितदादा गटाला 41 जागा मिळाल्या. राज्यात आणि महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. तर महाविकास आघाडीत ठाकरे गट सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिन्हाच्या घोळाचा या निवडणुकीतही शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार नऊ ठिकाणी पडल्याचं दिसून आलं आहे.
पिपाणी आणि तुतारी या चिन्हांमध्ये मतदारांचा घोळ झाला. त्यामुळे जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव पारनेर, केज, परांडा या नऊ मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार पडले. विशेष म्हणजे या उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला, त्यापेक्षा जास्त मते पिपाणीला मिळाली आहेत. यावरून मतदारांनी पिपाणीलाच तुतारी समजून मतदान केल्याचं दिसून आलं आहे. हा घोळ झाला नसता तर शरद पवार गटाच्या आमदारांची संख्या नऊने वाढली असती.