जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२५
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिलांना दरमहा मिळणाऱ्या ₹1500 सन्मान निधीबाबतची प्रतीक्षा आता संपली असून, जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला थेट त्यांच्या बँक खात्यांत जमा केला जाणार आहे.
योजनेबाबत माहिती देताना मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने रक्कम मिळणार आहे. हा निर्णय महिलांसाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास आर्थिक भेट ठरत आहे. महायुती सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेली ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी दरमहा ₹1500 सन्मान निधी देण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेत योजना सुरू झाल्यापासूनचा 13 वा हप्ता जुलै महिन्यासाठी वितरित केला जात आहे.
राज्य सरकारने जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी ₹2984 कोटींचा निधी मंजूर केला आहे. एकूण ₹28,290 कोटींच्या तरतुदीतून हा पहिला टप्पा आहे. या निधीमुळे लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळणार आहे. ‘लाडकी बहिण’ योजनेव्यतिरिक्त राज्यात पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरमहा ₹500 मिळतात, अशी माहितीही सरकारकडून देण्यात आली. या निर्णयामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये संतोष, समाधान आणि आनंदाचं वातावरण आहे. वेळेवर मिळणारी ही रक्कम त्यांच्यासाठी नात्यातील प्रेमाची आणि सरकारच्या पाठिंब्याची निशाणी ठरणार आहे.
