जळगाव मिरर | ३० जुलै २०२५
पुण्यातील गाजत असलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने पाच पुरुष आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी आणि दोन महिला आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र आता या प्रकरणात एक नवा वळण आलं असून डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांकडून पोलिसांवर थेट ५० कोटींचा मानहानी दावा दाखल करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
डॉ. खेवलकर यांच्यावर करण्यात आलेली कारवाई हेतुपुरस्सर असून त्यांना अडवण्यासाठीच हा सापळा रचण्यात आला, असा गंभीर आरोप वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे प्रकरण बनावट असून पोलिसांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती देत त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकरणातील महिला आरोपींपैकी एका महिलेच्या पर्समध्ये कोकेन सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, डॉ. खेवलकर यांचे वकील ठोंबरे यांनी सांगितले की, ही महिला पोलिसांनीच पाठवली होती. त्यामुळे हा सारा प्रकार पूर्वनियोजित होता, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
डॉ. खेवलकर यांच्याशी संपर्कात आलेले श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी या दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे उघड झाले आहे. श्रीपाद यादव याच्यावर यापूर्वी बेटिंग प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून तो अनेकदा अटकेत राहिला आहे. तर निखिल पोपटाणी याचा सिगारेट व्यवसाय असून तो ‘बुकी’ म्हणूनही ओळखला जातो. या पार्टीत ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या ‘राहुल’ नावाच्या व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत. हा व्यक्ती ड्रग्स पेडलर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांचा तपास या दिशेने सुरू आहे.
