जळगाव मिरर | १८ जुलै २०२४
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक तरुण तरुणीचा रील बनविण्याच्या नादात जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या असतांना नुकतेच मुंबईतील तरूणीचा इन्स्टाग्रामसाठी रील करतांना दरीत पडून मृत्यू झाला. ही घटना माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा येथे घडली. अन्वी कामदार असे या रीलस्टार तरूणीचे नाव आहे. व्यवसायाने ती सनदी लेखपाल आहे. सोशल मीडियावर रीलस्टार म्हणून तिने स्वताची ओळख निर्माण केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, रीलस्टार अन्वी आणि तिचे माणगाव तालुक्यातील कुंभे येथे वर्षा पर्यटनासाठी गेले होते. यावेळी सोशल मीडिया प्लॅटफार्म इन्टाग्रामसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी अन्वी एका कठड्यावर उभारून व्हिडिओ बनवत होती. यावेळी कठड्यावरून तोल गेल्यामुळे ती सुमारे 300 फूट दरीत कोसळली. या घटनेची माहिती अन्वीच्या सहकाऱ्यांनी माणगाव पोलीस ठाण्यात कळवली. ही माहिती समजताच माणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत त्यांनी स्थानिक बचाव पथकांना पाचारण केले. मात्र अन्वी खोल दरीत कोसळल्याने बचाव कार्यात अडचणी येत होत्या.
यानंतर घटनास्थळी कोलाड, माणगाव, महाड येथून प्रशिक्षीत बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. दोरीचा आधार घेत ही बचाव पथके दरीत उतरली. यावेळी अन्वी गंभीर जखमी अवस्थेत बचाव पथकाली दिसली. यावेळी बचाव पथकांनी तीला स्ट्रेचरच्या साह्याने दोरीचा आधार घेत तिला दरीतून बाहेर काढले. मात्र, माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता.