जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२४
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील दोन महिला व एक बालक नाशिक जिल्ह्यातील झोडगे येथे कानुबाईच्या कार्यक्रमासाठी जात असताना मालेगाव नजीक झालेल्या अपघातात कजगावच्या या तिघांना मोठी इजा झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील छाया विजय खानकरी हे त्यांच्या जेठाणी चित्रा दिलीप खानकरी व त्यांचा ९ वर्षाचा नातू अनवेध हे तिघे झोडगे येथे भावबंदकीत असलेल्या कानुबाई मातेच्या कार्यक्रमासाठी जात होते. ते प्रवास करत असलेल्या पॅजो रिक्षाचा मालेगाव नजीक एका गावाजवळ अपघात झाला. पुढे चालत असलेल्या अज्ञात वाहनावर रिक्षा आदळल्याने या तिघांना मोठा मार बसला आहे. यात छाया खानकरी यांच्या चेहऱ्यावर व पायाला तसेच अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आहे.
त्यामुळे त्यांना मालेगाव येथे व तेथून पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच चित्रा खानकरी व अनवेध या बालकालाही दुखापत झाली आहे. दरम्यान, त्या भागातील नागरिक व नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोठा अपघात घडला असूनही चालकाने अपघातावेळी केलेल्या असहकार्यांमुळे अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी मोठा संताप व्यक्त केला. वेगाने रिक्षा चालवताना अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.