जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२४
अमळनेर येथे रिक्षाचालक फोनवर बोलताना रिक्षा रस्त्याखाली उतरून उलटून झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना १४ रोजी सायंकाळी अमळनेर ते पारोळा रस्त्यावरील खोकरपाट फाट्याजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळ्याहून पॅजो रिक्षा (एमएच १९, एएक्स० ९२१८) ही अमळनेर येत असताना खोकरपाट फाट्यावर रिक्षाचालक फोनवर बोलत होता. त्याचे दुर्लक्ष झाल्याने ही रिक्षा रस्त्याच्या खाली उतरली. यातच पुढच्या चाकाला दगड आडवा आल्याने रिक्षा उलटली. या दुर्दैवी झालेल्या अपघातात रिक्षात बसलेले निवृत्ती कैलास जाधव (वय २८, रा. बाबू गॅरेजजवळ) हे तरुण जागीच ठार झालेत. तर पिळोदा येथील दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, निवृत्ती जाधव यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणला आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.