जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२५
राज्यातील शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर हे गंभीर गुन्ह्यात अडकले असतांना आता पुणे पोलिसांनी प्रांजल खेवलकर प्रकरणात न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या त्यांच्या मोबाईलमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे समोर आले आहे. या छेडछाडीमागे प्रांजल खेवलकर यांची पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा हात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यामुळे रोहिणी खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांनी पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर त्यांचे दोन मोबाईल जप्त केले होते. यापैकी एका मोबाईलमधील सिम कार्ड सोनार नावाच्या व्यक्तीच्या नावावर होते. प्रांजल खेवलकर अटकेत असताना, सोनारने आपले सिम कार्ड हरवल्याचे सांगून त्याच क्रमांकाचे दुसरे सिम कार्ड खरेदी केले. या नवीन सिम कार्डचा वापर करून त्याने जुन्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला. पोलिसांच्या मते, हा पुरावे नष्ट करण्याचा प्रकार आहे.
पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, सोनारने हे कृत्य जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या सांगण्यावरून केले. त्यामुळे रोहिणी खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट्स सापडल्याची माहिती न्यायालयात दिली आहे. खेवलकरने एका मुलीचा व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला ‘ऐसा माल चाहिए’ असा मेसेज करून पाठवला होता, असे पोलिसांनी सांगितले. या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे.