जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२५
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ मार्फत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत आहे. परंतु सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहे.
ही योजना फक्त गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी असताना हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता बोगस लाडकी बहिणींवर कारवाई देखील केली जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांची संख्या 8 हजारांहून अधिक आहे. राज्य सरकारने आता या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्याकडून पूर्ण पैसे देखील वसूल केले जाणार आहेत.
नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेतल्याबद्दल या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून जेवढ्या हप्त्यांचा लाभ घेतला आहे, ती सर्व रक्कम सरकार परत वसूल करणार आहे. त्याप्रकरणी वित्त विभागाने संबंधित विभागांना कर्मचाऱ्यांच्या वेतनातून सुमारे 15 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.