जळगाव मिरर | २ जानेवारी २०२५
इलेक्ट्रीक दुकानात प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या महेंद्र कैलास गोयल (वय १९, रा. सागर नगर) याच्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. त्याच्याकडून साडेसहा हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सागर नगरामध्ये प्रतिबंधित असलेला नायलॉनच्या मांजा विक्री होत असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोलीस नाईक किरण वानखेडे, विकी इंगळे, मुकुंद गंगावणे यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने छापा टाकत संशयित आरोपी महेंद्र कैलास गोयल याला अटक करून त्याच्याकडून साडेसहा हजार रुपये किमतीचा नायलॉनचा मांजा जप्त केला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय खैरे हे करीत आहे.