जळगाव मिरर | २४ मार्च २०२५
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी नजीक कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पूर्वी शासनाने हटवावी, अशी मागणी रायगड प्राधिकरण चे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यासंदर्भात भारतीय पुरातत्त्व विभागाने देखील समाधी संरचना व ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती अथवा पुरावे उपलब्ध नाही. समस्त भारतवासी यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार कोणती ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली वाघ्या कुत्रा समाधी 31 मे 2025 पूर्वी कायमस्वरूपी हटवावी, अशी विनंती संभाजीराजे यांनी केली आहे.
किल्ले रायगडपासून पाच किलोमीटरचा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करावा, अशी मागणी केंद्रीय पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र शासनाकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच रायगड प्राधिकरण चा सुरू असलेला कारभार हा अधिक पारदर्शक करावा, विकासात्मक कामाबाबत स्थानिक शिवभक्तांच्या मतांचा विचार करावा, असेही या पत्रामध्ये नमूद केले आहे.




















